MovieMate Media
लॉकडाऊनच्या काळात प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक

लॉकडाऊनच्या काळात प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक

06 May 2020 | Movie Mate Media

"कोरोना नकोना' हे पुस्तक इबुक(eBook) स्वरूपात. 

कोरोनाच्या संकटाने अख्ख्या जगाला वेठीस धरले आहे . कोरोनामुळे आरोग्याची समस्या गंभीर होत असताना , या विषयाचा सांगोपांग अभ्यास आणि विवेचन काळाची गरज बनले आहे. यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसने कोरोना सोबतच जगभरचे आजवरचे साथीचे आजार आणि त्याविरोधात जगभर झालेले प्रयत्न यांचा आढावा घेणारे 'कोरोना नकोना' हे पुस्तक इबुक(eBook) स्वरूपात प्रकाशित केले आहे. डॉ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे लिखित आणि संपादित हे पुस्तक लॉकडाऊन च्या काळात प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक आहे.  ऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसांनं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या आहेत. त्यातून जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे अनेक आशेची किरणं दिसत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या विषयाची पुन्हा उजळणी करणं गरजेचं बनलं आहे. या विषयाला रोगाचा आणि औषधाचा वास असला तरी, आजच्या काळात हे बाळकडू देणं गरजेचं वाटल्यामुळे डाॅ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे यांनी या पुस्तकात या विषयाला हात घातलेला आहे. सोबतच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.हमीद दाभोळकर, पर्यावरण वरण अभ्यासक डाॅ. रविंद्र व्होरा यांच्यासारख्या मान्यवरांनी या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे.  अविनाश धर्माधिकारी यांनी या पुस्तकात कोरोना काळातील शासकीय पातळीवरील नियोजनाचा आढावा घेतला आहे. कोरोनाने केवळ शारीरिक आघातच केलेला नाही तर त्याचे पडसाद निरनिराळ्या मानसिक आजारातही पाहायला मिळणार आहेत, या मानसिक पीडे पासून वेळीच सावधगिरी बाळगता येईल, अशी मांडणी डॉ.हमीद दाभोळकर यांनी केली आहे. निसर्गचक्र आणि पर्यावरण साखळी यांचाही कोरोनाशी थेट संबंध आहे, त्यामुळे एकूणच कोरोनाचे पर्यावरणीय परिणामही या पुस्तकात डॉ.रवींद्र व्होरा यांनी मांडले आहेत.   लॉकडाउन मध्ये छापील पुस्तकांची विक्री शक्य नाही, त्यामुळे हे पुस्तक प्रथम इ-बुक(Ebook) स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे. ऍमेझॉन(Amazon) आणि गुगल प्ले (Google Play) सारख्या संकेत स्थळावर हे पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

Share :