MovieMate Media
अनोखा ‘विस्टल ब्लोईंग सूट’ (Whistle blowing Suit)

अनोखा ‘विस्टल ब्लोईंग सूट’ (Whistle blowing Suit)

10 Sep 2020 | Movie Mate Media

विविध ऋतूंचे रागरंग, दिवसांचे सर्व प्रहर, अगणित पशुपक्षी. त्यांचे विविध मूड्स, लक्षावेधी आवाज, समुद्राची दर क्षणाला बदलणारी गाज, आकाशाचे सतत बदलणारे अनेकविध रंग, सूर्याच्या असंख्य तऱ्हा, अनेक रिअॅलिस्टिक लोकेशन्स. हे सारे टिपण्यासाठी तीन वर्ष केलेले अविरत चित्रीकरण. संहितेपासून ते पोस्ट प्रोडक्शनपर्यंत पाच वर्ष केलेली मेहनत. निसर्गचक्राची पर्वा न करता भिडलेले पाचशेहून अधिक कलाकार, तंत्रज्ञ.  आणि ही सारी धडपड एका मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी. नाव... ‘विस्टल ब्लोईंग सूट’  दृकश्राव्य माध्यमाचा सशक्त वापर, भारावून टाकणारे संगीत, कथेचा छाती दडपविणारा आवाका, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करून लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत.  समाजमाध्यमांवर ‘विस्टल ब्लोईंग सूट’ या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. एका मुलीच्या विविध भावभावनांच्या आविष्कारांचा एक विस्तीर्ण पट आपल्यासमोर उभा राहतो. काहीतरी वेगळं पहायला मिळणार याची जाणीव नक्की होते. हा चित्रपट विविध राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दमदार हजेरी लावण्यासाठी सज्ज झालेला आहे. चित्रपटासंदर्भातील इतर माहिती लवकरच आपल्या समोर येणार आहे.  हिंदी मालिका ‘नोंकझोक’ मधून बालकलाकार म्हणून काम केलेली व पुढे मालिका, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून  मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे. लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या ‘आई श्री भगवतीदेवी प्रोडक्शन’ या होम प्रोडक्शनची ही भव्य निर्मिती आहे. ज्ञानेश्वर मर्गज यांचे ‘संकासूर’, ‘राजभाषा’ हे महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माणधीन असून याआधी त्यांनी ‘एका वाडा झपाटलेला’, ‘निवडुंग’ या लोकप्रिय मालिका केल्या आहेत. ‘विस्टल ब्लोईंग सूट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी धाडसी विषयाला हात घालत एक अनोखा प्रयोग केला आहे.

Share :